Ad will apear here
Next
स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक
अत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिक, ‘पिंक पँथर’ सीरिजमुळे गाजलेला दिग्दर्शक ब्लेक एडवर्डस्, अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री हेलन मीरेन आणि संवेदनशील अभिनेत्री व निर्माती सँड्रा बुलक यांचा २६ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
स्टॅनले क्युब्रिक 

२६ जुलै १९२८ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला स्टॅनले क्युब्रिक हा सिनेसृष्टीच्या इतिहासातला अत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक व पटकथाकार मानला जातो. त्याच्या पाच सिनेमांना मिळून तेरा ऑस्कर नामांकनं मिळाली होती. त्याच्या फिल्म्स अत्यंत बारकाव्यानिशी मांडलेल्या असत आणि त्यात नाट्यमय दृश्यं असत. करिअरची सुरुवात ऐन १७व्या वर्षी छायापत्रकार म्हणून करून, पुढे वयाच्या २५व्या वर्षी त्याने ‘फिअर अँड डिझायर’ ही आपली पहिली फिल्म बनवली. किलर्स किस, किलिंग, पाथ्स ऑफ ग्लोरी, स्पार्टाकस, ‘लोलिता’ या फिल्म तुफान गाजल्या. क्युब्रिकच्या दिग्दर्शनाचं आणि जेम्स मॅसन आणि स्यू लायनच्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं. पुढचीच ‘डॉक्टर स्ट्रेंजलव्ह’ ही फिल्मही तुफान गाजली आणि त्याला चार ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली. १९६८ साली ‘२००१ : स्पेस ओडेसी’ हा त्याचा भव्य आविष्कार दुनियेसमोर आला आणि त्याने सर्वांना चक्रावून टाकलं. या फिल्मबद्दल त्याला स्पेशल इफेक्ट्सचं ऑस्कर मिळालं. आर्थर सी. क्लार्कच्या विज्ञानकथेवर आधारित या सिनेमातून मानव आणि संगणकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा लढा त्याने प्रभावीपणे दाखवून दिला होता आणि भविष्याच्या घटनाची नांदी दिली होती. ए क्लॉकवर्क ऑरेंज, बॅरी लिंडन, दी शायनिंग, आइज वाइड शट असे त्याचे पुढच्या काळात गाजलेले सिनेमे! सात मार्च १९९९ रोजी त्याचा मृत्यू झाला.   
......

ब्लेक एडवर्डस् 

२६ जुलै १९२२ रोजी ओक्लहोमामध्ये जन्मलेला विल्यम ब्लेक क्रम्प हा त्याच्या ब्लेक एडवर्डस् या रंगमंचीय नावाने विख्यात असणारा दिग्दर्शक! सुरुवातीला अभिनेता असणाऱ्या ब्लेकने नंतर दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून चांगलाच जम बसवला. १९४८ सालापासून त्याने पटकथाकार म्हणून हॉलिवूडमध्ये जम बसवायला सुरुवात केली आणि १९५५च्या ‘ब्रिंग युअर स्माइल अलाँग’पासून तो दिग्दर्शनात उतरला. १९६१ साली ऑड्री हेपबर्न आणि जॉर्ज पेपर्डला घेऊन त्याने ‘ब्रेकफास्ट अॅट टिफॅनीज’ हा नितांतसुंदर सिनेमा बनवला. पाठोपाठ आलेला ‘डेज ऑफ वाइन अँड रोझेस’ हा सिनेमाही चांगलाच गाजला. त्यामुळे त्याचं दिग्दर्शकीय कसब लोकांच्या नजरेत भरलं. १९६३ सालापासून त्याने पीटर सेलर्सला घेऊन ‘पिंक पँथर’ ही त्याची तुफान गाजलेली आणि अफाट लोकप्रिय झालेली हिट कॉमेडी सीरिज बनवायला सुरुवात केली. १९७९ सालचा डडली मूर आणि बो डेरेकला घेऊन त्याने बनवलेला ‘१०’ हा सिनेमा तुफान गाजला (मुख्यतः बो डेरेकच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने!). व्हिक्टर व्हिक्टोरिया, मिकी अँड मॉड, डार्लिंग लिली, ए फाइन मेस, दॅट्स लाइफ, स्किन डीप असे त्याचे इतरही अनेक सिनेमे गाजले आहेत. १५ डिसेंबर २०१० रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. 
......

हेलन मीरेन 

२६ जुलै १९४५ रोजी लंडनमध्ये जन्मलेली हेलन मीरेन ही अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री. शेक्सपीरियन कंपनीमध्ये नाटकं करणाऱ्या या अभिनेत्रीने २००७ या एकाच वर्षी एलिझाबेथ राणीची भूमिका निभावताना ऑस्कर, ऑलिव्हिए आणि टोनी हे पुरस्कार मिळवले होते. त्याआधी ब्रिटिश टेलिव्हिजनवरच्या गाजलेल्या प्राइम सस्पेक्ट या मालिकेतल्या डिटेक्टिव्ह जेन टेनिसन या भूमिकेसाठी तिने सलग तीन वर्षं बाफ्टा आणि दोन एमी पुरस्कार मिळवले होते. दुसऱ्या एका मिनी सीरिजसाठी तिला आणखी एक एमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.  क्वीन, एक्सकॅलिबर, आय इन दी स्काय, दी मॅडनेस ऑफ किंग जॉर्ज, दी कुक दी थीफ हिज वाइफ अँड हर लव्हर, स्टेट ऑफ प्ले, ओ लकी मॅन, मिडसमर नाइट्स ड्रीम, एज ऑफ कन्सेंट, २०१०, दी लाँग गुडफ्रायडे, व्हाइट नाइट्स, व्हेन दी व्हेल्स केम, गॉसफोर्ड पार्क, कॅलेंडर गर्ल्स, ब्रायटन रॉक, असे तिचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.
......

सँड्रा बुलक
 
२६ जुलै १९६४ रोजी व्हर्जिनियामध्ये जन्मलेली सँड्रा बुलक ही हॉलिवूडची संवेदनशील अभिनेत्री आणि निर्माती म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः हलक्याफुलक्या रोमँटिक भूमिकांबद्दल ती प्रसिद्ध आहे. लव्ह पोशन नंबर ९, दी व्हॅनिशिंग, डिमॉलिशन मॅन, स्पीड, व्हाइल यू वेअर स्लीपिंग, दी नेट, ए टाइम टू किल, इन लव्ह अँड वॉर, होप फ्लोट्स, प्रॅक्टिकल मॅजिक, मिस कॉन्जेनियालिटी, टू वीक्स नोटीस, दी ब्लाइंड साइड - असे तिचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. तिला एक ऑस्कर, एक गोल्डन ग्लोब आणि दोन स्क्रीन अॅक्टर पुरस्कार मिळाले आहेत.  
.......

यांचाही आज जन्मदिन :
महान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ (जन्म : २६ जुलै १८५६, मृत्यू : दोन नोव्हेंबर १९५०)
‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’चे लेखक ऑल्डस हक्स्ली (जन्म : २६ जुलै १८९४, मृत्यू : २२ नोव्हेंबर १९६३) 
‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी (जन्म : २६ जुलै १९७२)
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
पर्ल हार्बर आणि सेरेंडिपिटी सिनेमांची अभिनेत्री केट बेकिन्सेल (जन्म : २६ जुलै १९७३) 
‘आय लव्ह ल्युसी’ आणि ‘हिअर्स ल्युसी’ची सहअभिनेत्री विव्हियन व्हान्स (जन्म : २६ जुलै १९०९, मृत्यू : १७ ऑगस्ट १९७९)
'गायी घरा आल्या' कवितेचे कवी वा. गो. मायदेव (जन्म:२६ जुलै १८९४, मृत्यू:३० मार्च १९६९)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZLYBQ
Similar Posts
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
विक्रम साराभाई, सेसिल डमिल भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
शकील बदायुनी उर्दू भाषेतले मातब्बर शायर आणि गीतकार शकील बदायुनी यांचा तीन ऑगस्ट हा जन्मदिन.
मनोहर श्याम जोशी, रॉबर्ट शॉ ‘भारतीय दूरदर्शन सोप ओपेराचे जनक’ असं ज्यांना आदराने म्हटलं जातं, ते मनोहर श्याम जोशी आणि शेक्सपीरियन रंगभूमी व हॉलिवूडचे सिनेमे गाजवणारा अभिनेता रॉबर्ट शॉ यांचा नऊ ऑगस्ट हा जन्मदिन.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language